मंथन परीक्षेत सार्थक नानेगांवकर प्रथम; माण तालुक्यासह, जिल्हा-राज्यातही सार्थकचा डंका
म्हसवड / महेश कांबळे : शालेय विद्यार्थ्यांसाठी वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत म्हसवड येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ३ मध्ये शिकत असलेल्या सार्थक शितल राजेंद्र नानेगांवकर या विद्यार्थ्याने माण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सार्थक याचे हे यश विशेष वाखण्याजोगे आहे, त्याने माण तालुक्यात प्रथम येण्याबरोबरच सातारा जिल्ह्यात ६ वा तर राज्यात ११ क्रमांक पटकावत माणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या सार्थक ने यासाठी कोणतीही खाजगी शिकवणी न लावता आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली नियमित अभ्यास व सराव करुन हे यश संपादित केले आहे. दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने लहान गटात १५० पैकी १३० मार्क मिळवत हे यश संपादित केले आहे. सार्थक च्या या यशाबद्दल त्याला वर्ग शिक्षक सुनील डोंगरे यांच्या हस्ते गौरव चिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले, यावेळी क्रिडा शिक्षक चंद्रकांत जाधव, राजाराम तोरणे, नितीन काशीद, मुंगळे मँडम, सुवर्णा ओतारी शितल नानेगांवकर, आदींसह वैभव गणेश मंडळाने त्याचे अभिनंदन केले.
सार्थकचा सार्थ अभिमान
मंथन परीक्षेत सार्थकने मिळवलेले यश हे खरोखर कौतुकास्पद असून, त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे शिक्षण क्षेत्रात अव्वल येतात. यावर शिक्कामोर्तब झाले आहे, शहरी भागातील विद्यार्थीच या परिक्षेत अव्वल येतात हा पालकांचा समज आज सार्थकच्या यशाने खोडुन काढला. सार्थकच्या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे मत यावेळी मुख्याध्यापक सुनील डोंगरे यांनी व्यक्त केले.
सार्थकने असेच यशाचे शिखर गाठावे
सार्थकने मंथन परीक्षेत जे यश प्राप्त केले आहे, त्यासाठी त्याची आई शितल नानेगांवकर यांनी विशेष परिश्रम घेतले, त्याच्या या यशात त्याच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. त्याने शाळांतर्गत सर्व परिक्षेत असेच यश संपादित करुन यशाचे शिखर गाठावे, असे यावेळी सार्थकचे वडील राजेंद्र नानेगांवकर यांनी म्हटले आहे.






