फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI अप्रेंटिस भरती 2026 अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना आता 15 जून 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी अर्जाची शेवटची तारीख 8 जून निश्चित करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 7,150 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. पदवीधर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळवण्याची आणि भविष्यातील करिअरसाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे.
इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. मात्र, ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. NAPS नोंदणी पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी या दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत सामान्य व आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, तर्कशक्ती, संख्यात्मक योग्यता आणि संगणकीय योग्यता या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी द्यावी लागेल. मात्र, ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेली असेल, त्यांना या चाचणीतून सूट मिळणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत त्यांना दरमहा 15 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. मात्र, ही नियुक्ती अप्रेंटिसशिप स्वरूपातील असल्याने नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन किंवा वैद्यकीय सुविधा यांसारखे लाभ मिळणार नाहीत. बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा.






