फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC Civil Services Prelims 2026: यंदा संघ लोक सेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत मोठा बदल केला आहे. आता पहिल्यांदाच नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या लगेचच ‘प्रोव्हिजनल आन्सर की’ (तात्पुरती उत्तरतालिका) प्रसिद्ध केली जाणार आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उमेद्वारांना हरकती नोंदवण्याची संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 24 मे 2026 रोजी घेणार आहे. आता आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेच्या नंतर प्रोव्हिजनल आन्सर की तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. जेणेकरून उमेद्वार आपल्या उत्तरांची तपासणी करू शकतील. अनेक दिवसांपासून उमेद्वार या बदलाची मागणी करत होते.
आता नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर उमेद्वार ऑनलाइन माध्यमातून आपल्या हरकती नोंदवू शकतील. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उमेद्वार 31मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन ‘क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल’ (QPRep) द्वारे आपल्या तक्रारी किंवा सूचना पाठवू शकतील. ही सुविधा यूपीएससीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल.
दरवर्षी सुमारे 5 लाखांपेक्षा जास्त उमेद्वार यूपीएससी पूर्व परीक्षेला बसतात. परंतु, केवळ 12 ते 15 हजार उमेद्वार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. आधी विद्यार्थ्यांना हे समजत नव्हते की, त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करावी की पुढील वर्षांच्या पूर्व परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे. आता पूर्व परीक्षेची आन्सर की प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांना आपल्या गुणांचा अंदाज लवकर येऊ शकेल.
यूपीएसीसीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले की, हे पाऊल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शी उत्तरदायी आणि सहभागी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा विश्वास दृढ करणे हे आयोगाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






