संग्रहित फोटो
पुणे : ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी तुमच्या मुलाला आर्थिक गैरव्यवहार आणि देशाच्या विरोधात काम केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्याची भिती घालून तब्बल २ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ७४ वर्षीय महिलेने सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एरंडवणा येथे एकट्याच राहतात. त्यांची मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. महिलेला १५ फेब्रुवारी रोजी नाशिक पोलिसांचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअॅपचा व्हिडिओ कॉल केला. त्यांना धमकावले. या कॉल्समध्ये समोरच्या व्यक्तीने आपण नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे असल्याचे सांगितले.
‘तुमच्या नावाने नाशिकच्या कॅनरा बँकेत एक खाते उघडले आहे. त्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात आहे. हे खाते तक्रारदाराच्या बायोमेट्रिक डेटाचा वापर करून उघडल्याची बतावणी चोरट्यांनी केली. शिवाय, एका व्यक्तीचा फोटो पाठवून तो भारत सरकारच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचे सांगितले. तक्रारदाराच्या नावाने उघडलेल्या बँक खात्याचा वापर नरेश गोयलच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप सायबर चोरट्यांनी केला.
धमकी देऊन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले
फसवणूक करणाऱ्या चोरट्यांनी त्यांना अधिक भिती घालत तुमच्या मुलालाही अडकवले जाईल, अशी भिती घातली. त्यामुळे तक्रारदार घाबरल्या, त्यांनी चोरट्यांच्या सांगण्यावरून बँक खात्यातील व्यवहारांची पडताळणी करण्यास त्यांच्या तीन बँक खात्यातून वेगवेगळ्या ट्रान्झेक्शनद्वारे सायबर चोरट्यांना २ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये पाठवले. त्यावर ‘तुमची रक्कम परत केली जाईल,’ सायबर चोरट्यांनी महिलेला सांगितले होते. मात्र पैसे परत न मिळाल्याने तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.