संग्रहित फोटो
मंचर : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अशातच आता आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे एका २४ वर्षीय विवाहित महिलेने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मयत मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेरणा शुभम तांबडे या विवाहितेचा विवाह ३० एप्रिल २०२५ रोजी शुभम बाबुराव तांबडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच कारणावरून पत्नीला वारंवार शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. मयत मुलीची आई सुनिता शंकर निघोट यांनी मंचर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 30 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ मे रोजी मंचर येथे झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमातही संबंधित पतीने पत्नी आणि तिच्या बहिणींना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रेरणा या मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
दरम्यान, शनिवार ३० मे रोजी सकाळी नातेवाईकांचा फोन आल्यानंतर कुटुंबीय तांबडेमळा येथे पोहोचले असता प्रेरणा यांनी घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर मयत मुलीच्या आईने मयत मुलीचे पती शुभम बाबुराव तांबडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव करीत आहेत. या घटनेमागील नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार असले तरी या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.






