संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता वैमनस्यातून भावंडांवर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केटयार्ड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७), ऋषीकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरमान समीर शेख (वय २५), शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय २७, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आशुतोष व ऋषीकेश यांच्या नातेवाईकांचे २६ जुलै रोजी निधन झाले. दोघे जण अंत्यविधीसाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मार्केटयार्डातील डॉ. आंबेडकरनगर परिसरातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांना अडवले. वैमनस्यातून आरोपींनी आशुतोष आणि ऋषीकेश यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी तपास करत आहेत.
हडपसरमध्ये काका-पुतण्याच्या खुनाचा प्रयत्न
हडपसर भागात दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या टोळक्याने काका-पुतण्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज रामा माने (वय २९, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) आणि त्याचे काका आरोपींनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यानूसार, कनवरसिंग कालूसिंग टाक, झलकसिंग त्रिलोकसिंग टाक, मंगेशसिंग विजयसिंग जुनी (तिघे रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज माने, त्यांचा चुलत भाऊ अविनाश माने, समाधान माने हे सोमवारी (२७ जुलै) वेताळबाबा वसाहतीत दुपारी गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपीं तेथे दारू पिऊन आले. आरोपी गोंधळ घालत होते. त्यामुळे आरोपींना माने याने जाब विचारला. या कारणावरुन आरोपी चिडले. आरोपींनी सूरज आणि त्याचे काका यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी परिसरात दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.






