संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसात पूर्वी दिलेली तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका रिक्षाचालकाला त्याच्याच सावञ मुलासह त्याच्या मेव्हाण्याने मारहाण करुन चाकू हल्ला करुन जखमी केले आहे. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फाजलपुरा पुलावर घडली आहे.
सावत्र मुलगा फरहान खान अफरोज खान आणि त्याचा मेव्हणा शेख खदिर उर्फ हमिस माया शेख रहिम (दोघे रा. महेमुद पुरा) अशी फायटर व चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद हिदायत सय्यद रफिक (४०, रा. रिशदपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे रिक्षाचालक असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा फरहान खान याच्याशी दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी फरहान खानने त्यांच्या घरी येऊन हिदायत व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार सिटी चौक पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून २० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हिदायत हे रिक्षा घेऊन फाजलपुरा पुलावरून जात असताना फरहान खान व त्याचा मेव्हणा शेख खदिर ऊर्फ हमिस माया यांनी त्यांना अडविले. तू आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे म्हणत धमकी दिली. व शिवीगाळ करत हिदायत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फरहान खानने चाकूने हिदायत यांच्या पोटावर वार केला, तर शेख खदिर याने फायटरने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. हिदायत यांनी आरडाओरडा केल्यानंतर दोघांनी जिवे मारण्याची धमकी देत तेथून धूम ठोकली. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.






