संग्रहित फोटो
वडगाव मावळ : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता वडगाव मावळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना २४ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, प्राण येवले याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी आणि रणजित देशमुख यांचे काही फोटो कॅफेमध्ये काढण्यात आले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत रणजित तिच्यावर सतत दबाव टाकत होता. त्याचे मित्र अभिषेक ढोरे व प्राण येवले हेदेखील मुलीला रणजितशी जबरदस्तीने मैत्री करण्यास भाग पाडत होते. इतकेच नव्हे तर मुलीचे लग्न मोडण्याची आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. हा प्रकार डिसेंबर २०२४ पासून सुरू होता.
एक आरोपी फरार
या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून मुलीने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. यानंतर तिच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रणजित देशमुख व अभिषेक ढोरे यांना अटक करण्यात आली असून, प्राण येवले फरार आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली पुणे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव भागात घडली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंडला गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.