संग्रहित फोटो
फलटण : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘काका तुमच्या एटीएमवरून पैसे निघत नाहीत, हे धरा तुमचे कार्ड’, असे म्हणून एटीएम कार्डची अदलाबदल करून अज्ञाताने सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फलटण येथे ही घटना घडली आहे. याबाबत पोपट दत्तोबा साळुंखे (रा. राजुरी, ता. फलटण) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी स्वतः लक्ष्मीनगर फलटण येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या डाव्या बाजूला उभा राहिलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांचे एटीएम कार्ड हातात घेऊन ‘काका, तुमचे एटीएममधून पैसे निघत नाहीत. हे घ्या तुमचे एटीएम कार्ड. आम्हाला पैसे काढायचे आहेत’, असे म्हणून अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचे एटीएम कार्ड हातचलाखी करून दुसरेच एटीएम फिर्यादीला दिले व फिर्यादीचे एटीएम घेऊन त्या एटीएम कार्डमधून विविध ठिकाणच्या एटीएम सेंटरमधून १ लाख ७६ हजार ३५१रुपये काढून फसवणूक केली. याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. महिला पोलिस हवालदार पूनम बोबडे तपास करत आहेत.