संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. डोंबविलीच्या सराफ कारागिराकडील तब्बल ३४ लाख रुपयांचे दागिने खासगी बस ट्रॉव्हल्समधून प्रवास करताना दोन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजापूर ते मुंबई ट्रॉव्हल्समधून प्रवास करताना ही घटना घडली असून, पाठिमागच्या सीटवर बसलेल्या दोघांनी ते चोरल्याचा संशय आहे. याप्रकरणी भेहराराम कुमावत (वय ४४, रा. डोंबिवली ईस्ट) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भेहराराम हे डोंबिवली ईस्ट परिसरात सराफी कारागिर म्हणून काम करतात. येथे दागिने तयार केल्यानंतर ते विजापूर येथील काही सराफांना विक्री करतात. गेल्या दीड वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. दरम्यान, ते दागिने घेऊन विजापूर येथे गेले होते. काही दागिने विक्री केले. उर्वरित ३३ लाख ५० हजारांचे दागिने व १ लाख १२ हजार रुपयांची रोकड घेऊन ते विजापूरवरून मुंबईकडे परतत होते. ते खासगी ट्रॉव्हल्सने प्रवास करत होते. त्यांच्या पाठिमागील सीटवर दोन व्यक्ती बसलेल्या होत्या.
बस हडपसर टोल नाक्याजवळील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ आल्यानंतर लघुशंकेसाठी थांबविली होती. तेव्हा काही पॅसेंजर खाली उतरले. तक्रारदार देखील उतरले होते. ते परत आले, तेव्हा त्यांना बॅगेतील दागिने व रोकड चोरून नेल्याचे लक्षात आले. ते मुंबईत गेले. संबंधित सराफांना याची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना प्रथम तक्रारीत तथ्य आढळले नव्हते. परंतु, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. तेव्हा पाठिमागे बसलेले पॅसेंजर द्राक्ष केंद्रापासूनच गायब झाल्याचे लक्षात आले. तसेच, त्यांचे मोबाईल देखील घटनेनंतर बंद झाल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले आहे. आता पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.