संग्रहित फोटो
पुणे : बंगळुरुमधील एका कांदा व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कांदा व्यापाऱ्याने मालाची ऑर्डर देऊन पैसे दिल्यानंतर देखील त्याला कांदा न पाठवता फसवणूक केल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी धनंजय खुशालचंद बोरा याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत शशीकुमार टी. वैद्यलिंगम पिल्लई (वय ४६, रा. रवींद्रनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शशीकुमार बंगळुरूमधील कांदा व्यापारी आहेत. त्यांनी पुण्यातील मार्केटयार्ड येथील घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले होते. तेव्हा त्यांचा बोरा याच्याशी संपर्क झाला होता. बोरा याने मार्केट यार्डात त्याचे गाळे असल्याचे सांगितले होते. नंतर शशीकुमार यांनी त्याच्याकडून २५ टन कांदा खरेदीचा व्यवहार केला. त्यापोटी त्याला ५ लाख रुपये पाठविले. २ नोव्हेंबर रोजी ट्रकमधून कांदा बंगळुरुतील पाठविल्याचे बोराने त्यांना सांगितले.
कांदा न पोहोचल्याने त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा ट्रकमध्ये बिघाड झाल्याचे सांगून बोराने त्यांना ट्रकमालकाच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने दहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. शशीकुमार यांनी दहा हजार रुपये पाठविले. मात्र, कांदा बंगळुरुत पोहोचला नाही. नंतर त्यांनी बोरा याच्याशी संपर्क साधला. तेव्हा बोरा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी शशीकुमार यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : घाटात विवाहितेचा आढळला मृतदेह, डोक्यात लोखंडी हत्याराने वार
कांदा भाव खाणार…
मार्केटयार्ड तसेच किरकोळ बाजारात देखील सध्या कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात जुन्या कांद्याला मोठा दर मिळत आहे. महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यातून मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढील काही महिने कांदा चांगलाच भाव खाणार असल्याचे दिसते.
मदतीच्या बहाण्याने दोघांची फसवणूक
एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करून फसवणूक केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये या घटना घडल्या आहेत. पैसे काढून देताना नागरिकांकडून पासवर्ड घेतला आणि हातचालाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. नागरिक गेल्यानंतर परस्पर त्यांच्या खात्यातून पैसे काढले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली घटना २३ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसहा ते साडेसहाच्या सुमारास घडली.पहिल्या घटनेतील ५० वर्षीय तक्रारदार नवी पेठ परिसरात आले होते. त्यावेळी ते महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांगितले. त्यासाठी अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराकडून एटीएमचे कार्ड घेतले व पासवर्ड विचारला. पैसे काढण्याचा बहाणा करून संबंधिताने हातचालाखीने कार्ड बदलले आणि पैसे निघत नाहीत, असे सांगितले. नंतर अनोळखी व्यक्ती आणि तक्रारदार तेथून निघून गेले. थोड्या वेळाने अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराच्या एटीएम कार्डचा वापर करून १० हजार रुपये काढून घेतले.