नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई (संग्रहित फोटो)
मुरगूड : हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुरगूड नगरपरिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगूड एसटी बसस्थानक परिसरात 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुरगूड परिसरात खळबळ उडाली.
मुरगूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी नगरपरिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केलेल्या एका ठेकेदाराचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व एम.बी. रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन हुपरी नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी 50 हजार रुपये आरोपीने यापूर्वी स्वीकारले होते. उर्वरित 80 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 40 हजार रुपये आज देण्याचे ठरले होते. त्यानुसार, संबंधित ठेकेदार लाच रक्कम घेऊन मुरगूड येथे आला असता, आरोपीने ही रक्कम मुरगूड एस. टी. बसस्थानकात उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले.
हेदेखील वाचा : Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. यावेळी लाच रक्कम व आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. यानंतर आरोपीला मुरगूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक तत्काळ रवाना करण्यात आले असून, घरझडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
7 हजारांची लाच स्वीकारताना एकाला पकडले
दुसऱ्या एका घटनेत, राज्यात अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी लाच स्विकारल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाढत्या घटना रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. अशातच आता शिरूरच्या पूर्व भागातील शिरसगाव काटा सजातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४ ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. यामुळे शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Indian Army officer Arrested: संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या घरी कॅश’चा डोंगर सापडला, नोटा मोजण्यासाठी CBIची धावपळ






