बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा (संग्रहित फोटो)
पुणे : भरदिवसा रस्त्यात महिलेला चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३४ वर्षीय ट्रकचालकाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. पीडितेने केलेल्या वर्णनाच्या आधारे गुन्हा करून पसार झालेल्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी जेरबंद केले होते. कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये आणि न्यायालयात साक्ष नोंदवताना पीडितेने आरोपीला ओळखले. पीडितेची साक्ष, त्याला सुसंगत डीएनए आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी हा निकाल दिला.
करमवीर गुलाबराव जेसवार (वय ३४, रा. बिसनपूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेने तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली होती. ही घटना ४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी गहुंजे ते साईनगर रस्त्यावर मामुर्डी येथील क्रिकेट मैदानाजवळच्या गवताळ भागात घडली. पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी गुन्ह्याचा तपास केला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील लालचंद ओसवाल यांनी सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासले. पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.
दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थिती, फाटलेले कपडे, डीएनए विश्लेषण आणि वैद्यकीय तपासणी अहवालांनी या साक्षीला दुजोरा दिला. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा तसेच संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला. मात्र, पीडितेच्या साक्षीवर विश्वास ठेवण्यास पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीकडून दंडाची रक्कम वसूल करून ती पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
न्यायालयाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण
‘कोणतीही सामान्य महिला एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचा खोटा आळ लावण्याचे धाडस करणार नाही. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील पीडितेची साक्ष ही जखमी साक्षीदाराच्या साक्षीइतकीच महत्त्वाची असते,’ असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीचा खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा बचाव फेटाळला.
छत्री देण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी
पीडित महिला आणि तिची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी दुपारी २ वाजता काम संपवून पीडिता पायी घरी परतत होती. मुसळधार पाऊस सुरू असल्याने तिच्याजवळ छत्री होती. सेवा रस्त्याने पुलावरून जाताना आरोपीने तिला अडवून छत्री मागितली. पीडितेने नकार दिला असता, आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत गवताळ भागात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
जीव वाचवण्यासाठी नग्नावस्थेत घेतली धाव
पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला मारहाण करून कपडे फाडले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता. अखेर आरोपीच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेत पीडितेने नग्नावस्थेतच मुख्य रस्त्यावर धाव घेतली. तिची अवस्था पाहून थांबलेल्या एका रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याने तिला ‘करोना’चे ‘पीपीई किट’ परिधान करण्यासाठी दिले. नंतर एका कारचालकाने तिला घरी पोहोचवले. पीडितेने कुटुंबियांना आणि घरमालकिणीला घडलेला प्रकार सांगून पोलिस ठाण्यात धाव घेतली.






