संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातील चार बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. चारही फ्लॅटमधून साडे तीन लाखांचा ऐवज लांबविला असून, विमानतळ, हडपसर, लोणीकंद तसेच हडपसर भागात या घटना घडल्या असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
श्रीराम निंबा खैरनार (वय ३९, रा. लक्ष्मीनगर, पेरणे फाटा, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार पेरणे फाटा परिसरात राहतात. ते कामानिमित्त बाहेर गावी घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तर, कपाटातील ९२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. खैरनार कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.
दुसरी घटना देखील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, डोंगरगाव येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, तसेच रोकड असा ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अनिल महादू गायकवाड (वय ३५, रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.
बंद फ्लॅट फोडत ७० हजारांची रोकड लंपास
तिसऱ्या घटनेत हडपसर भागातील बंद फ्लॅट फोडत ७० हजारांची रोकड चोरुन नेली आहे. याबाबत श्रीनिवास दुर्गादास नंदे (वय ३५) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. शनिवारी सकाळी नंदे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोकड चोरुन नेली. सहायक फौजदार जांभळे तपास करत आहेत.
रविवारी फोडले दोन फ्लॅट
लोहगाव भागात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी बॅगेत ठेवलेले १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. रविवारी महिला या सायंकाळी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. तर दुसरा चोरीचा प्रकार हडपसरमध्ये घडला असून, मांजरी बुद्रुक येथील फ्लॅट फोडून ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.