संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता घरात वाढदिवस साजरा करताना गोंधळ घातल्याने शेजाऱ्याने कुटूंबियाला मारहाण केल्याची घटना आंबेगाव खुर्द येथे घडली आहे. यात तरुणाच्या डोक्यला दुखापत झाली आहे. ही घटना आंबेगाव खुर्द येथील हनुमाननगर येथील श्री अपार्टमेंटमध्ये १० फेब्रुवारीला मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका १७ वर्षीय मुलासह तरुणावर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह श्री अपार्टमेंटमध्ये राहायला आहे. तो हॉटेल मॅनेजरची नोकरी करतो. तर, आरोपीही त्याच अपार्टमेंटमध्ये राहतात. तक्रारदाराच्या बहिणीचा वाढदिवस असल्याने १० फेब्रुवारीला मध्यरात्री त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यावेळी तक्रारदाराने घरात ध्वनीक्षेपकावर गाणी लावली होती. त्यामुळे काही प्रमाणात गोंगाट झाला होता. त्या रागातून आरोपींनी तक्रारदाराच्या घराकडे जाऊन वाद घातला. नंतर आरोपीने कशाच्या तरी साह्याने तक्रारदाराच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. तर, तक्रारदाराच्या पत्नीला व बहिणीला देखील मारहाण केली आहे. ही घटना मध्यरात्री घडली आहे. तक्रारदार जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आले. त्यांची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.
हे सुद्धा वाचा : एटीएममधून पैसे काढणाऱ्या महिलेची फसवणूक; तब्बल 80 हजारांना घातला गंडा
मित्रानेच मित्राला संपवलं
आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत काम करणाऱ्या कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्रानेच त्याचा खून केला आहे. दोन दिवसानंतर खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पसार झालेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयनप्रसाद (वय ४२) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. तपासात त्याचा खून त्याचा साथीदार व मित्र असलेल्या आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. तात्कालिक कारणावरून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.