संग्रहित फोटो
पुणे : सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक तसेच ऑनलाईन टास्कचे आमिष यासह वेगवेगळ्या कारणांनी पुण्यातील नागरिकांची तब्बल १ कोटी ८९ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार जिमखाना भागात राहण्यास आहेत. त्यांना चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी ४ लाख ८ हजार ४९९ रुपयांची फसवणूक केली. कोरेगाव भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणूक व लोणावळ्यात बंगला खरेदी करुन देण्याच्या आमिषाने १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
वर्क फ्रॉर्म होमच्या बहाण्याने तरुणाची ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चंदननगर भागातील एकाची १० लाख ६९ हजार १४९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. लोणीकंदमधील तरुणाला देखील अशाच पद्धतीने १३ लाख ५० हजार रुपयांची फसणूक करण्यात आली. तर, कोंढव्यातील ५२ वर्षीय नागरिकाची चोरट्यांनी १६ लाख ७९ हजार २०० रुपयांना फसवणूक केली. हडपसर भागातील ज्येष्ठ नागरिकाची १६ हजार ७२० रुपयांची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने मुंढवा येथील व्यक्तीची ३ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
कारवाईची भीती दाखवून २३ लाखांची फसवणूक
काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाला २३ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुण लोहगाव भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याला मोबाइलद्वारे संपर्क केला. काळ्या पैसे व्यवहारात मुंबई गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यात तुमचे नाव असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाला तातडीने पैसे भरण्यास सांगितले. ऑनलाइन पद्धतीने तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली कराड तालुक्यातील सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर-काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आगाशिवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.