संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक अत्यंत धडक पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, शहरातील विविध भागांत दहशत माजवणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या तब्बल ५ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका – MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईत एकूण ४५ हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मकोकाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात मारामारी, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी उकळणे, अंमली पदार्थांची विक्री आणि दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाणे (पहिली टोळी) : टोळी प्रमुख आफताब समीर शेख (वय २४, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) याच्यासह रेहान रियाज तांबोळी, सिद्दीक सलाम शेख यांच्यासह एकूण ७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाणे (दुसरी टोळी) : टोळी प्रमुख साबीर समीर शेख (वय २३, रा. गांधीनगर, देहूरोड) आणि त्याच्या टोळीतील निखील उर्फ लखन बाळू आवळे, नौशाद नजीर शेख, संदिप बाळू तेलंग यांच्यासह तब्बल १७ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
काळेवाडी पोलीस ठाणे : टोळी प्रमुख विकी शंभूसिंग सुतार (वय ३१) याच्यासह अभिषेक नरसिंग मांडगुळे, सोमनाथ पाटील आणि महेश गिरासे अशा ४ सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाळुंगे पोलीस ठाणे : टोळी प्रमुख सागर बाळू जावळे (वय ३४) याच्यासह नितीन संजय शिंदे, सौरभ उर्फ सोन्या मोरे यांच्यासह ७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
चिखली पोलीस ठाणे : टोळी प्रमुख अंबादास उर्फ सोन्या राजू राठोड (वय २४) आणि त्याच्या टोळीतील अराफत हबुल्ला शहा, विशाल उर्फ बंटी गौतम, अरमान उर्फ शिवा गौतम यांच्यासह ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व गुन्हेगारी टोळ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बेकायदेशीर शस्त्रे बाळगून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी या टोळ्यांची माहिती गोळा केली आणि त्यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत प्रस्तावास मंजुरी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, आणि गुन्हे शाखेच्या विविध पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी यांनी केली.






