संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असू, दररोज राज्यातील विविध भागातून लूटमार, सोनसाखळी हिसकावणे, दरोडे, घरफोड्या यासारख्या घटना घडत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने लपलेल्या दोन तरुणांना रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्या आहेत. ज्योतून कंपनीच्या पार्किंगजवळ दोन तरुण पोलिसांना पाहून अंधारात लपताना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ते त्या ठिकाणी आल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस शिपाई संतोष अशोक अडसूळ (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींची नावे प्रवीण मोहन अंधारे (वय १८, रा. विश्रांतवाडी, पुणे; मूळगाव – उंबरी, ता. माजलगाव, जि. बीड), लक्ष्मण राजेंद्र घोडके (वय २२, रा. शास्त्री चौक, भोसरी, पुणे; मूळगाव – नदीहत्तरगा, ता. निलंगा, जि. लातूर) आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे हे करीत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य चोरीचा कट उधळून लावण्यात यश आले आहे.
वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली
वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
अभिनेत्री बिजलानींचा बंद बंगला फोडला
मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे असलेल्या अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या बंद बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहमद मुजीफ खान (वय ५४, रा . जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमद खान हे माजी क्रिकेटपटू मोहमद अजहरउद्दीन यांचे स्वीय सहायक आहेत. संगीता मोहमद अजहरउद्दीन-बिजलानी यांच्या मालकीचा मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे बंगला आहे.