संग्रहित फोटो
यवत : दौड परिसरातील गोपाळवाडी येथील सरपंचवस्ती जवळ बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या देशी- विदेशी दारूच्या अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान सेवानिवृत्त पोलीसचं दारू विक्री करीत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती ठाणे अमलदार बापू रोटे यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांना माहिती मिळाली की, सरपंचवस्ती परिसरात बेकायदेशीर देशी -विदेशी दारू विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. खबर मिळताच घोडके यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना दिली. गोपाळ पवार यांनी तत्काळ कारवाईची सूचना केली. युवराज घोडके यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी छापा मारला असता शिवाजी संभाजी जाधव(रा. सरपंच वस्ती दौंड) देशी -विदेशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री करीत होता. पोलीस पथकाने या अड्ड्यावरून दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेचं गांधी चौक आणि इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून या ठिकाणी पत्त्याचा क्लब चालवणारा आणि पत्ते खेळणारे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कडक कारवाई करणार
दौंड शहर आणि परिसरात जो कोणी मटका जुगारासह बेकायदेशीर धंदे करीत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिला आहे. दरम्यान या कामी साध्या वेशातील पोलीस पथक नेमण्यात आलेले असून, हे पोलीस पथक बेकायदेशीर धंदे सुरू असलेल्या ठिकाणी टेहाळणी करतील. सर्वसामान्य माणसांना आणि महिलांना त्रास देणारे, याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांची छेड काढणाऱ्या तरुणांवर देखील साध्या वेशातील पोलीस टेहाळणी ठेवणार आहेत. तेव्हा भविष्यात कायद्याच्या दृष्टीकोनातून बेकायदेशीरपणे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले.