जुगारा अड्ड्यावरील धाडीत रोख रकमेसह दोन लाख 56 हजार 299 रुपयांचा मुद्देमाल जप्त
बार्शी : बार्शीचा अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा तालुक्यातील बेकायदेशीर व्यवसायांचा कर्दनकाळ ठरत आहेत. बार्शी शहरातील गजबजलेल्या मुख्य पोस्ट ऑफिस चौकातील जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (दि.२९) दुपारी अडीच वाजता निर्भया पथकाने धाड टाकून जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेत 39 हजारांच्या रोख रकमेसह एकूण दोन लाख 56 हजार 299 रुपयांचा जुगार साहित्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे तेल गिरणी चौका पाठोपाठ पोस्ट ऑफिस चौकातही मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या धाडसत्रामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी झालेल्या जुगार अड्ड्यावरील धाडीत अतुल मोहन नवगण (वय 45, भवानी पेठ), दत्तात्रेय संतोष गंधे (वय 21, सुभाष नगर), शरीफ गुलाब तांबोळी (वय 57, बालाजी कॉलनी), शंकर सोपान लोखंडे (वय 42, अलिपुर रोड) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सरकारतर्फे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम चार व पाचप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत जुगार खेळताना लागणारे आठ मोबाईल हँडसेट, ब्लू प्रिंट कंपनीचे ब्लूटूथ, प्रिंटर, मोबाईल कीबोर्ड, कॉम्प्युटर की-बोर्ड, मोबाईल चार्जर, फोन पे पेमेंट स्कॅनर, मोबाईल पॉवर बँक, मोबाईल स्टॅन्ड, गणक यंत्र, रबरी शिक्के, कागदी रोल, पाकीट, मार्कर पेन, लाल शाईचे बॉलपेन, आकडे लिहिलेले फळे, लाकडी पेपर पॅड, समर्थ एम नावाची कागदी पावती पुस्तक, ऑनलाईन विनिंग रिपोर्ट, वही, आधी साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत निर्भया पथकाचे हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, चालक भाऊसाहेब महानोर, बार्शी शहर पोलीस ठाणे वाहतूक अंमलदार अनंत वनकळस, पांढरे यांनी सहभाग घेतला.
लोणावळ्यातही झाली होती कारवाई
यापूर्वी, पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला होता. कुणेनामा (ता. मावळ) येथील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि सहा आलिशान गाड्यांसह एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बंगला मालकासह २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






