छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून (Photo Credit- X)
२५ मे रोजी कच्ची घाटी परिसरात २५ ते २७ वयोगटातील एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने चिकलठाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र प्रकरण गंभीर असल्याची दखल घेत पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्ह शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.
त्यानंतर मृताची ओळख शेख आवेश शेख परवेज (रा. कसबा चौक, जालना, ह.मु. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथ) अशी पटली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलवीर बहुरे, शिवाजी मगर, निलेश कुडे तसेच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे आदींनी केली.
तपासादरम्यान मयत आवेश हा २५ मे रोजी सकाळी त्याचा मित्र शेख फैयाज याच्यासोबत काळ्या रंगाच्या स्कुटीवर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर संशयाची सुई फैयाजकडे वळली. पोलिसांनी त्याला किरडपुरा येथील घरातून ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
मयत आवेश हा त्याचा मित्र असला तरी तो आरोपीच्या पत्नीची वारंवार छेड काढत होता. याबाबत अनेकदा समज देऊनही तो ऐकत नसल्याने आरोपीच्या मनात संताप होता. २५ मे रोजी सकाळी दोघेही दारू पित असताना पुन्हा याच कारणावरून वाद झाला. भांडण विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात फैयाजने आवेशचा खून केला.






