Ashok Kharat Case : प्रतिभा चाकणकरांच्या अडचणींत वाढ होणार; 'ईडी'कडून समन्स जारी
नाशिक : अनेक निष्पाप लोकांना मृत्यूची भीती दाखवून लुटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना ‘ईडी’ ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
समता पतसंस्थेत खरात अनेक खात्यांना ‘नॉमिनी’ भोंदू खरातने केवळ फसवणूकच केली नाही, तर अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे. जगदंबा आणि समता पतसंस्थेत खरात हा शेकडो खात्यांचा ‘नॉमिनी’ असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. विशेष म्हणजे, रूपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावानेही एक खाते उघडण्यात आले असून, त्यातील व्यवहारांची आता सखोल चौकशी केली जात आहे.
तसेच, मृत्यूची भीती दाखवत लोकांकडून पैसे उकळून खरातने तब्बल एकवीस देशांची सफर केल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व प्रकरणामुळे तपास अधिक गतीने सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागडी कारही केली स्वत:च्या नावावर
भोंदू खरातने एका व्यापाऱ्याला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून तब्बल चार ते पाच कोटी रुपये उकळले आहेत. इतकेच नव्हे, तर मृत्यूची भीती दाखवून या व्यापाऱ्याकडून एक महागडी कार स्वतःच्या ताब्यात घेतली आणि नंतर ती कागदोपत्री स्वतःच्या नावावर करून घेतली. सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी न्यायालयात युक्तिवाद करत खरातच्या या गंभीर गुन्ह्यांची माहिती दिली. अशाच प्रकारे त्याने अजून कोणाकोणाची फसवणूक केली आहे, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
प्रतिभा चाकणकरांचा 250 पेक्षा जास्त वेळा खरातला फोन
या प्रकरणात सर्वात मोठी कलाटणी तेव्हा आली, जेव्हा प्रतिभा चाकणकर आणि भोंदू खरात यांचे संबंध समोर आले. तपासादरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खरातला दोनशे पन्नासपेक्षा जास्त वेळा कॉल केल्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून (सीडीआर) उघड झाले आहे. याशिवाय, समता पतसंस्थेतील सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहारांप्रकरणी ‘ईडी’ आता त्यांची चौकशी करणार आहे. या घटनेमुळे चाकणकर कुटुंबाच्या चौकशीची मागणी राजकीय वर्तुळातून जोर धरू लागली आहे.






