Ashok Kharat Case : अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार; खंडणीच्या गुन्ह्यात अडकणार
नाशिक : धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.३०) विनयभंगाच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील सात गुन्ह्यांना हा अपवाद ठरला.
पुण्याच्या व्यावसायिकाला गंडा घातल्याप्रकरणी नोंदवलेल्या खंडणीच्या नवव्या गुन्ह्यात खरातला शुक्रवारी (दि. १) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खरातला अटक करून तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी पक्षातर्फे अॅड. किरण बेंडभर आणि अॅड. शैलेंद्र बागडे यांनी बाजू मांडली. मात्र, बचाव पक्षाचे वकील अॅड. सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध केला. हा गुन्हा पूर्वीच्या बलात्कार प्रकरणासारखाच असून, यात केवळ विनयभंगाचा आरोप आहे, त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, तक्रारदार महिला आणि तिचे पती खरात याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याने महिलेच्या पतीला बाहेर थांबवून, महिलेवर धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिच्या हातावरून आणि पाठीवरून ‘मंतरलेला’ दगड फिरवून विनयभंग केला. तुझ्यावर दैवी शक्ती आहे, माझ्या स्पर्शामुळे तुझे कल्याण होईल, असे सांगून त्याने पीडितेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास देवाचा कोप होईल, अशी भीतीही दाखवली होती.
…अशी वसूल केली खंडणी
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सरकारी पक्षाने खरातला खंडणीच्या नवव्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य केली. पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना मृत्यूची भीती दाखवून खरातने ४ ते ५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. या पैशातून खरातने चक्क तुर्की देशातून ९० लाखांचे फर्निचर मागवले होते आणि जासूद यांच्या खर्चाने अनेक देशांत पर्यटनही केले होते. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
Ashok Kharat Case : अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर; सरकारी डॉक्टरला सोबत घेऊन…






