रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा घरगुती फेसमास्क, सकाळी उठताच त्वचेवर येईल चमकदार ग्लो
प्रत्येकाला कायमच सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो आणि तारुण्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध क्रीम आणि सीरम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. दिवसभर धूळ, प्रदूषण आणि उन्हामुळे त्वचा पूर्णपणे टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्वचा काळवंडून जाते. याशिवाय चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, मुरूम आणि सुरकुत्या येऊन त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोणते फेसमास्क लावावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर डाग कमी होऊन त्वचेमध्ये ओलावा कायम टिकून राहतो. फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा आतून मुलायम आणि सॉफ्ट होईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर तारुण्य टिकवून ठेवतात.
स्वयंपाक घरात दूध कायमच उपलब्ध असते. दुधाची साय आणि मधाचा वापर करून तयार केलेला फेसमास्क त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यास मदत करेल. दुधाची साय कोरड्या त्वचेसाठी वरदान ठरते. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. अन्यथा चेहऱ्यावर दुधाचा वास येऊ लागेल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी काकडीचा वापर करावा. काकडी आणि कोरफड जेल एकत्र करून तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून रात्रभर तसेच ठेवा. काकडीच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा कायमच फ्रेश दिसेल. रात्री झोपण्याआधी काकडी आणि कोरफड जेलचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कायमच हायड्रेट राहील.






