संग्रहित फोटो
पुणे : सायबर गुन्ह्यांत भरमसाठ वाढ होत असताना पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो शादी डॉटकॉम मॅट्रिमोनियल साईटवरून तब्बल साडे तीन हजार महिलांशी ‘कनेक्ट’मध्ये असल्याचे समोर आले आहे. त्याने पुण्यातील एका महिलेची साडे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्या प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर चौकशीतून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. तो महिलांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. त्याने यातील किती महिलांना फसविले आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला (मूळ भारतीय, सध्या स्थायिक- ऑस्ट्रेलिया) असे आरोपीचे नाव आहे. त्याला २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक सुशिल डमरे व त्यांच्या पथकाने केली आहे.
दिल्लीतील एक महिला पुण्यात खराडी येथे काही काळ राहत होती. तिने शादी डॉट कॉमवर लग्नासाठी प्रोफाइल तयार केले होते. २०२३ मध्ये आरोपीने डॉ. रोहित ओबेरॉय नावाच्या प्रोफाइलद्वारे तिला मेसेज केला. स्वतःला ऑस्ट्रेलियात राहणारा डॉक्टर असल्याचे सांगितले. मैत्री केली. नंतर तो पुण्यातही आला. दोघे पुण्यासह भारतात इतर ठिकाणी एकत्र राहिले. या महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून ५ कोटी रुपयांची पोटगी मिळाली होती. ती या पैशातून लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम सुरू करणार होती. ही माहिती आरोपीला कळाल्यावर त्याने तिचा विश्वास संपादन केला. व्यवसायासाठी सिंगापूरहून गुंतवणूक मिळवून देतो, असे सांगून त्यासाठी ‘इव्हॉन हँदायनी’ आणि ‘विन्सेंट कुआण’ नावाच्या बनावट लोकांची ओळख करून दिली.
तिघांनी मिळून पीडित महिलेला सिंगापूर आणि भारतातील विविध बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने तीन कोटी ६० लाख रुपये भरायला लावले. नंतर आरोपी ऑस्ट्रेलियाला गेला आणि महिलेशी संपर्क टाळला. काही दिवसांनी महिलेला एका इमेलद्वारे ‘डॉ. रोहित’चा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण, महिलेला संशय आल्याने तिने तक्रार दिली होती.
आरोपीची खरी ओळख समोर
सायबर पोलिसांच्या तपासात ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ हे नाव बनावट असून, त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे समोर आले. तो मूळचा लखनऊचा असून सध्या ऑस्ट्रेलियात पर्थ येथे स्थायिक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले असून, तेथे लग्नही केलेले आहे. त्यास दोन मुले आहेत.
‘लुकआउट’ नोटीशीमुळे आरोपीची माहिती
पोलिसांनी आरोपीविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केला होता. तो २५ जूनला सिंगापुरहून मुंबई विमानतळावर येणार होता. त्याची माहिती ‘इमिग्रेशन ब्युरो’कडून पुणे सायबर पोलिसांना समजली. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.
हजारो महिलांना मेसेज
आरोपीने शादी डॉट कॉमवर खोटे प्रोफाइल तयार करून ३१९४ महिलांना मेसेज पाठवले होते. त्यामुळे आरोपीने अजून किती महिलांना फसवले आहे, याचा तपास सुरू आहे. आरोपीकडून (प्रोफाइल क्रमांक एसएच-८७३४१२३१) कोणाची फसवणूक झाली असेल, तर ७०५८७१९३७१/७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले आहे.