संग्रहित फोटो
पुणे : गुंड टीपू पठाण टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अट्टी शेखच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, त्याच्याशी संबंधित तब्बल ६० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांतील सहआरोपी, टोळीतील सदस्य आणि त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजलीच्या नावाखाली गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे ‘रील’ बनवणाऱ्या तरुणांचा यात समावेश आहे.
शाहरुख शेखवर खुनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत माजवणे अशा १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर त्याने गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केल्यानंतरही त्याने पत्नी आणि लहान मुलांना ढाल करत गोळीबार केला. नंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पाच राऊंड फायर केले आणि त्यात शाहरुख ठार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात राहत असलेल्या घरात ही थरारक प्रकार घडला होता.
मोबाईल व काळी दुचाकीवरून तपासाचा धागा
शाहरुखच्या हालचालींबाबत मिळालेल्या मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने पोलिसांनी शिरापुर गावातील तरुणाला ताब्यात घेतले. त्याने शाहरुखला लांबोटी परिसरातील गॅरेजवर भेटल्याची माहिती दिली. शाहरुखने त्याच्याकडून फोन वापरून नातेवाईकांना संपर्क साधला होता. याच आधारावर पोलिसांनी लांबोटीतील मोबाईल शॉपी चालकाकडे चौकशी केली असता, शाहरुखने १३ मे ते १३ जून दरम्यान नऊ वेळा फोन करून आर्थिक मदतीची विनंती केली होती. तो काळ्या मोपेडवरून फिरत असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक वेगाने तपास सुरू केला. शाहरुखच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींवर नजर ठेवली. टोळीतील इतर सदस्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : जीवघेण्या इंजेक्शनचा नशेसाठी वापर; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या