सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे नागरिक व शेतकरी हैराण झालेले आहेत. अशातचं आता विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या पथकाने पाच जणांना मुद्देमालासह अटक करत तब्बल ११ गुन्हे उघड केले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होऊन शेतकरी अडचणीत सापडले होते. या चोरट्यांचा पर्दाफाश करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, संतोष मारकड, नवनाथ नाईकडे, नारायण वाळके यांनी चोऱ्या होणाऱ्या ठिकाणचे सिसिटीव्ही तपासले. त्या आधारे आरोपींची माहिती घेत सागर जाधव, राजू पारधी, राहुल मधे, किरण खंडागळे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी शिक्रापूर परिसरात तब्बल ११ ठिकाणी चोऱ्या करुन त्यातील तांब्याच्या तारा नारायणगाव येथे विक्री केल्याचे काबुल केले. दरम्यान पोलिसांनी तारा घेणाऱ्या पांडुरंग वायकर यास ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल १९० किलो तांबे जप्त केले.
आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी
दरम्यान पोलिसांनी सागर शिवराम जाधव (वय ३० रा. म्हाळुंगे पडवळ ता. आंबेगाव जि. पुणे), राजू प्रभू पारधी (वय ४०) व किरण गोविंद खंडागळे (वय ३० दोघे रा. जवळके बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे), राहुल संतोष मधे (वय २५) व पांडुरंग दशरथ वायकर (वय ४० दोघे रा. नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे) यांना अटक केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मारकड हे करत आहेत.