सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटण्याच्या घटना वाढत असताना शिक्रापूर पोलिसांनी चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २४ मोबाईल व चाकू जप्त केले आहेत.
नवनाथ दशरथ वाडेकर (वय २२ रा. होराडवस्ती साईनगर सिंहगड रोड पुणे मूळ रा. वाळूंज पारगाव ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर), शिवराम मुरलीधर गोंडे (वय २१ रा. होराडवस्ती साईनगर सिंहगड रोड पुणे मूळ रा. येवता ता. केज जि. बीड) व पंढरीनाथ बालाजी खलाटे (वय २१ रा. होराडवस्ती साईनगर सिंहगड रोड पुणे मूळ रा. कवठा ता. वसमत जि. हिंगोली), असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) येथील २४ वा मैल येथे काळूराम आढाव व कासरी फाटा येथे ज्ञानेश्वर जाधव या दोघांना तीन अज्ञातांनी चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल असताना पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे यांना गुन्ह्यातील आरोपी कोरेगाव भीमा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंके, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहिदास पारखे, जयराज देवकर, शिवाजी चितारे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव यांनी कोरेगाव भीमा परिसरात सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींना केले न्यायालयात हजर
पोलीस पथकाने त्यांच्याकडून चोरीचे तब्बल चोवीस मोबाईल जप्त केले. कारवाईमध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहेत.