संग्रहित फोटो
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) आणि परिसरातील वेगवेगळ्या महिला तसेच युवतींना मोबाईलवर वारंवार मेसेज करून मानसिक त्रास देणाऱ्या एका विकृत तरुणाला शिक्रापूर पोलिसांच्या शोध पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. विशाल राजेंद्र गव्हाणे (वय अंदाजे २४, रा. बेलवडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिक्रापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक तरुणी व महिलांना एका विशिष्ट मोबाईल नंबरवरून वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज येत होते. या त्रासाला कंटाळून अखेर एका धाडसी तरुणीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात रीतसर फिर्याद दाखल केली होती. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा माग
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. सायबर सेलच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी काही पीडित महिला व कतरुणींकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली. यादरम्यान पोलिसांना विशाल गव्हाणे या युवकावर संशय आला. पोलिसांनी सापळा रचून विशालला ताब्यात घेतले आणि त्याची सखोल चौकशी सुरू केली.
मोबाईल तपासताच पोलिसांना धक्का
पोलीस हवालदार बापू हाडगळे यांनी संशयित विशालचा मोबाईल जप्त करून त्याची कसून तपासणी केली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. त्याच्या मोबाईलमधून तब्बल ५० हून अधिक महिला आणि तरुणींना वेगवेगळ्या वेळी अश्लील मेसेज पाठवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विशालने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला काही दिवसांपूर्वी एक सिम कार्ड सापडले होते. तसेच एका कंपनीच्या कामगारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तो ॲड होता. त्या ग्रुपमधून त्याने अनेक महिला व तरुणींचे नंबर चोरले आणि त्यांना मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली, अशी कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस हवालदार बापू हाडगळे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी
तपास पथकाचे कौतुक
महिला छेडछाडीचा हा गंभीर गुन्हा तांत्रिक कौशल्याच्या बळावर अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणल्याबद्दल शिक्रापूर पोलिसांच्या शोध पथकाचे आणि विशेषतः पोलीस हवालदार बापू हाडगळे यांचे परिसरात कौतुक होत आहे. कोणत्याही महिलेला अशा प्रकारचा त्रास होत असल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.






