सौजन्य - नवराष्ट्र टीम
लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात बनावट मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तीन चारचाकी वाहनांसह सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि नांदेड विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या निर्देशानुसार लातूरचे अधीक्षक युवराज गोशिनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी २३ जुलै रोजी लातूर, निलंगा आणि चाकूर विभागाच्या संयुक्त पथकाने अवैध मद्य वाहतुकीप्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात लातूर जिल्ह्यातील खंडापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे बनावट मद्यनिर्मिती व विक्रीचे अड्डे असल्याचे उघड झाले. त्यानंतरच्या कारवाईत आणखी आरोपींना अटक करण्यात आली असून, अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. कारवाईदरम्यान तीन चारचाकी वाहनांमधून बनावट विदेशी मद्य, गोवा निर्मित व्हिस्कीच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बुचे, इसेन्स, प्लास्टिक बॅरल, मद्यनिर्मितीचे साहित्य तसेच मोबाईल फोन असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासात हा साठा खंडापूर व येणेगुर येथून पुरविला जात असल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण कारवाईत एकूण ३० लाख २८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक जी. व्ही. साळवे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
कारवाईचा इशारा
या मोहिमेत अधीक्षक युवराज राठोड यांच्यासह उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान तसेच पोलीस विभागाच्या सायबर शाखेतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, धाब्यांवर मद्यसेवनास परवानगी देणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक युवराज राठोड यांनी दिला आहे. तसेच अवैध मद्याबाबतची माहिती नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.






