एमआयडीसी वाळूजमध्ये औद्योगिक कंपन्यांमध्ये सलग तीन ठिकाणी चोरी (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): एमआयडीसी वाळूज परिसरात चोरट्यांनी औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करत सलग दोन कंपन्या आणि एक दुकानामध्ये चोरी केली आहे. या घटनांमधून एकूण तब्बल सहा लाख रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला असून, आणखी सुमारे तीन लाखांचे नुकसानही केले आहे. तिन्ही घटनांची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
फिर्यादी सोमनाथ ज्ञानेश्वर चव्हाण (२४, रा. सुतगिरणी चौक, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी ६ ते ११ ऑक्टोबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान, एमआयडीसी वाळूज येथील एसएमएस वाळुज सीईपीपी प्रा. लि. कंपनी (प्लॉट क्र. क्यू १ भाग १ व २) परिसरातून चोरट्यांनी ३ लाख रुपये किंमतीच्या कॉपर वायरची चोरी केली, तसेच सोलर प्लेट्स तोडून आणखी ३ लाखांचे नुकसान केले.
दुसरी घटना व्हेंचर इंडस्ट्रीज (प्लॉट क्र. जी ३९/२, एमआयडीसी वाळूज) येथे घडली. फिर्यादी वैभव विजयराव सासवडे (३८, रा. राजनगर सोसायटी, शहानुरवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते १ नोव्हेंबर सकाळी ९.४५ या वेळेत कंपनीची खिडकी फोडून चोरट्यांनी कंपनीतून ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यात १९ हजारांची मोटार, १५ हजारांची मोटार, ६ हजारांचे हँड ग्राईंडर, ४ हजारांच्या दोन ड्रील मशिन, ३ हजारांचे दोन हँड कटर, १५०० रुपयांचे ब्लोअर यांचा समावेश आहे.
तिसऱ्या घटनेत साईराम प्लंबिंग हार्डवेअर (गट क्र.१४७, तिसगाव रोड, एमआयडीसी वाळूज) येथे चोरट्यांनी हात साफ केला. गजानन माधवराव गारडे (५५, रा. समर्थनगर, तिसगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, तिसगाव रोडवर गारडे यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. २८ ऑक्टोबर रोजी गारडे हे दुकान बंद करुन नेहमी प्रमाणे घरी गेले होते. संधीसाधत चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा फोडून दुकानातून ५९ हजार रुपये किंमतीचे सीपी फिटींग, पिलर कॉक, मिक्सर, नळ, अँगल कॉक, इ. साहित्य चोरुन नेले. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी गारडे हे दुकान आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.
तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी औद्योगिक भागातील कंपन्या व दुकाने लक्ष्य केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाळूज पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्ही फुटेज तपास, शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.






