संग्रहित फोटो
पुणे : मुंढवा भागात मद्यपी काररचालकाने रात्रपाळीदरम्यान गस्त घालणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकणी मोटार चालकावर शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबु्क्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकणी कार चालक प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. पानमंद वस्ती, म्हस्केवाडी, जि. अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी प्रशांत नायडू यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी (दि. २३ मे) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कार चालक म्हस्के मुंढव्यातील रेल्वे उड्डाणपुलावरुन निघाला होता. लोणकर वजनकाट्याजवळ भरघाव कारने एका ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्त घालणारे पोलिस कर्मचारी प्रशांत नायडू तेथे गेले. कार चालकाने नायडू यांना शिवीगाळ केली. ‘तुम्ही पोलिस विकले गेले आहेत. बलात्कार होतो. तुम्ही तेथे जात नाहीत. आम्हाला त्रास देता’, असे सांगून नायडू यांना धक्काबुक्की केली. नायडू यांच्याकडील मोबाइल घेऊन त्याने जमिनीवर आपटला. कार चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कारचालकाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…
शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून
रेणापूर तालुक्यातील कासारगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणात ९ जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला होता. हा वाद इतका वाढला की संबंधित व्यक्तींनी धारदार व काठ्यांचा वापर करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात शिवाजी बाबुराव आमण्णावर, गोविंद शिवाजी आमण्णावर, ज्ञानेश्वर शिवाजी आमण्णावर, गोवर्धन गोपाळ आमण्णावर, करण गोपाळ आमण्णावर, गोजरबाई शिवाजी आमण्णावर, राणी गोविंद आमण्णावर, सोनाली ज्ञानेश्वर आमण्णावर आणि गोपाळ शिवाजी आमण्णावर या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत व्यक्ती मनोज उमर माणिक आमण्णावर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.






