मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या (Photo Credit - X)
नेमकी घटना काय?
गुरुवारी सुतगिरणी चौक परिसरात विजय अशोक पवार हे आपल्या मित्राची वाट पाहत उभे होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या हातातील मोबाइल जोरात हिसकावून पळ काढला. या प्रकरणी जव्हारनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सापळा रचून अटक
गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि विजय सुरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोबाइल हिसकावणारे चोरटे बीडबायपास परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात पाळत ठेवली. संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सुतगिरणी चौकातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली.
आरोपींची माहिती
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. विशाल विठ्ठल तुपे (वय २१, रा. अमेरनगर, बीडबायपास): विशाल हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. २. आबिद अनिस पटेल (वय १८, रा. अन्नार कॉलनी, रेल्वे स्थानक परिसर): आबिद हा मजुरी काम करतो. दोघेही आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील असून केवळ अधिकच्या पैशांच्या हव्यासापोटी ते गुन्हेगारीकडे वळल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांचे आवाहन
पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरात अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






