संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील रॉयल मेन्स वेअर कपड्याच्या दुकानाचे पत्रे उचकटून सदर दुकानातील कपडे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील चौफुला येथे सचिन शिवले यांचे रॉयल मेन्स वेअर नावाने कपड्याचे दुकान असून, सचिन हे सायंकाळी दुकान बंद करुन घरी गेलेले असताना सकाळच्या सुमारास सचिन यांच्या कपड्याच्या दुकानाचे पत्रे उचकटले असल्याचे शेजारील दुकानदारांना दिसल्याने त्यांनी याबाबतची माहिती सचिन यांना देताच त्यांनी दुकानात येत पाहणी केली. आसरा शेजारील दुकानाच्या बाजूने अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून दुकानातील तब्बल पन्नास हजार रुपये किमतीचे वेगवेगळे शर्ट व पॅन्ट चोरी केल्याचे दिसून आले.
दरम्यान त्यामुळे सचिन यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील कपडे चोरी केल्याचे निदर्शनास आले, याबाबत सचिन राजाराम शिवले (वय २६ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रफिक शेख हे करत आहेत.