संग्रहित फोटो
पुणे : पीएमपी बस प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोरेबाग बसस्टॉप जवळ कात्रज ते अरण्येश्वर चौक सहकारनगर प्रवासादरम्यान ही चोरीची घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहतात. शनिवारी त्या कामानिमित्त पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. अरण्येश्वर चौकात बसमधून खाली उतरताना महिलेला गळ्यात सोन्याचे गंठण दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार बी. के. खुटवड करीत आहेत.
महिलेच्या पर्सवर चोरट्यांचा डल्ला
निगडी ते पुणे स्टेशन असा बसप्रवास करणार्या ३३ वर्षीय महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी तब्बल १ लाख १७ हजार रूपयांचे दागिने चोरून नेले. दुपारी हा प्रकार घडला असून, याप्रकरणी महिलेने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. महिला तळवडे परिसरात राहते. कामाच्या निमित्ताने पीएमपी बसने प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. पुणे स्टेशनवर उतल्यानंतर महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. अधिक तपास उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.
सोन्याची पाटली चोरली
स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकातून निगडीच्या दिशेने जाणार्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या पाटलीवर डल्ला मारला आहे. ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली आहे. याबाबत तक्रारदार ६६ वर्षीय जेष्ठ महिलेने खडकी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार बोपोडी येथे राहायला आहेत. त्या स्वारगेटला आल्या होत्या. नंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी गोंधळ केला. महिलेच्या हातातील सोन्याची पाटली काही सेंकदात कापून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक कस्पडे करीत आहेत.