दिल्ली मतदानासाठी सज्ज, देशाचे लक्ष दिल्लीकडे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Delhi Elections 2025 polling Day LIVE: दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि जनता ठरवेल की पुढचे सरकार कोण बनवेल. आम आदमी पक्ष (आप) पुन्हा सत्तेत येईल की भाजप सरकार स्थापन करेल? दिल्ली निवडणुकीपूर्वी सुरक्षा आणि तपासणी दाखवत, सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहतूक आणि मार्ग देखील वळवण्यात आले आहेत, त्यामुळे ओखला मतदारसंघासारख्या संवेदनशील भागात सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरूवात होत आहे
05 Feb 2025 04:38 PM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्रिकोणी लढाई होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली. आज बुधवारी मतदान सुरू आहे. दिल्लीतील ११ जागा मुस्लिम बहुल मानल्या जातात. चांदणी चौक, मटिया महल, बल्लीमारन, ओखला, सीमापुरी, सीलमपूर, बाबरपूर यासारख्या जागांवर मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे. ११ पैकी सात जागांवर मतदानाची टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. दुपारी ३ वाजेपर्यंत दिल्लीत ४६.५५ टक्के मतदान झाले आहे.
05 Feb 2025 03:46 PM (IST)
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान, दिल्ली रणांगणात रूपांतरित होताना दिसत आहे. सर्व लहान-मोठे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. एकीकडे, भाजपचा आरोप आहे की आम आदमी पक्ष बनावट मते टाकत आहे तर दुसरीकडे, आपचा आरोप आहे की भाजप नेते जनतेमध्ये पैसे वाटत आहेत.
05 Feb 2025 03:15 PM (IST)
बिजवासन मतदारसंघातील भाजप उमेदवार कैलाश गेहलोत यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले. गेहलोत हे केजरीवाल सरकारमध्ये मंत्री होते. गेल्या वर्षी त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी सांगितले की, विकसित दिल्लीसाठी लोकांनी मतदान केले पाहिजे. निवडणूक आयोगाने केलेल्या व्यवस्थेवर सर्वजण खूश आहेत.
05 Feb 2025 02:42 PM (IST)
महाराष्ट्राचे मंत्री आशीष शेलार यांनी म्हटले की, आम आदमी पार्टी दिल्लीतील निवडणूक हरत आहे, म्हणूनच अरविंद केजरीवाल मतदार यादी आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना स्वतःला सर्वोच्च न्यायालयापेक्षा वरचे समजू लागले आहे. जसे शहरी नक्षलवादी सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स यांसारख्या भारतातील सर्व संस्थांवर सातत्याने प्रश्न उठवत असतात, तसेच आता केजरीवालही या संस्थांवर आरोप करू लागले आहेत.
05 Feb 2025 02:35 PM (IST)
८ फेब्रुवारी रोजी दिल्ली अरविंद केजरीवालपासून मुक्त होईल. भाजप दिल्लीत येत आहे, अशा शब्दांत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आम आदमी पक्षाला डिवचलं आहे.
05 Feb 2025 02:32 PM (IST)
भाजप मतदारांना उघडपणे एका इमारतीत घेऊन जाऊन पैसे वाटत असल्याचा आरोप जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांनी आरोप केला आहे. पैसे वाटल्याच्या आरोपांची पुष्टी होऊ शकत नाही. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
05 Feb 2025 01:29 PM (IST)
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि रोहिणी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विजेंदर गुप्ता म्हणाले की, आज मतदान आहे, लोकशाहीचा महान उत्सव आहे. दिल्लीत नवीन सरकार निवडण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. यावेळी भाजप दिल्लीत प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.
05 Feb 2025 12:55 PM (IST)
दिल्ली पोलिस मतदान केंद्रावर नागरिकांना मतदान करण्यापासून रोखत असल्याचा आरोप आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केल आहे.निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. मतदानकेंद्रापर्यंत पोहचू नये यासाठी हे बॅरिकेड्स लावण्यात आल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
05 Feb 2025 12:23 PM (IST)
दिल्ली निवडणूक २०२५ साठी मतदान केल्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी निर्माण भवनातून बाहेर पडल्या. त्यांच्यासोबत त्यांची कन्या आणि पक्षाच्या खासदार प्रियंका गांधी वढेरा आणि नवी दिल्ली मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार संदीप दीक्षित हे देखील होते.
05 Feb 2025 12:17 PM (IST)
ईशान्य जिल्ह्यात सर्वाधिक तर मध्य जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले. दिल्लीतील ईशान्य जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.८७ टक्के मतदानासह ११ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान झाले. मध्य जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वात कमी १६.४६ टक्के मतदान झाले.
05 Feb 2025 12:03 PM (IST)
बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराज्यपाल व्हीके सक्सेना, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मतदान केले आहे. सकाळी ११:०० वाजेपर्यंत १९.९५% मतदान झाले आहे.
05 Feb 2025 11:56 AM (IST)
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांनी मतदान करण्यासाठी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी म्हटले की, मतदान हे एक महान दान आहे...ते लोकशाहीचा पाया आहे आणि मतदान ही सर्व अधिकारांची जननी आहे. यापेक्षा वर कोणताही अधिकार नाही. प्रत्येकाने मतदान करावे, अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले.
05 Feb 2025 11:22 AM (IST)
काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्ली निवडणुकीसाठी मतदान केले. गेल्या १० वर्षांत जर दिल्ली एका गोष्टीसाठी ओळखली जात असेल, तर ती म्हणजे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील लढाई...काँग्रेसच्या राजवटीत असे घडले नाही. जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार होते आणि दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते, तेव्हाही आम्ही दिल्लीत जास्तीत जास्त विकास साधला होता. म्हणूनच लोकांना आता पुन्हा काँग्रेसची आठवण येत आहे. भाजप आणि आप यांना त्यांचा पराभव दिसत आहे, म्हणूनच ते प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहेत."
05 Feb 2025 10:11 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नवी दिल्ली मतदारसंघातील उमेदवार प्रवेश वर्मा यांनी मोठे वक्तव्य केले. त्यांना विचारले गेले की, "जर आपण निवडणूक जिंकलात तर आपण दिल्लीचे मुख्यमंत्री व्हाल का?" यावर त्यांनी उत्तर दिले, "याचे उत्तर मी देऊ शकत नाही."
"८ फेब्रुवारीला AAP ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करेल"
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पुढे सांगितले, "मी सर्व नवीन मतदार, तसेच वृद्ध मतदारांना आवाहन करतो की, ते मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावेत आणि आपला हक्क बजावावा. कारण ८ फेब्रुवारीला आम आदमी पक्ष (AAP) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जाईल. कारण त्या दिवशी भाजप सरकार स्थापन करत आहे."
05 Feb 2025 09:44 AM (IST)
सकाळी ९ वाजेपर्यंत दिल्लीत ८.१०% मतदान, ताहिरच्या जागेवर सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
05 Feb 2025 09:01 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते जनतेला मतदान करण्याचे आवाहन सतत करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे दिल्लीतील जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले की, "मी दिल्लीतील आदरणीय जनतेला त्यांचे मौल्यवान मतदान करण्याचे आवाहन करतो. तुमचे एक मत दिल्लीत बदलाचे प्रतीक ठरेल."
05 Feb 2025 08:53 AM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निर्माण भवनातील मतदान केंद्रावर मतदान केले. रराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तुघलक क्रेसेंट येथील एनडीएमसी स्कूल ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
05 Feb 2025 08:28 AM (IST)
भारताते लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, "मला अभिनंदन करायचे आहे. आज लोकशाहीत प्रत्येकजण आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. हा केवळ लोकशाही अधिकारच नाही तर सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारीही आहे. ते या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहेत''.
05 Feb 2025 08:12 AM (IST)
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, "...प्रदीर्घ वर्षांचा संघर्ष आज संपुष्टात येणार आहे. दिल्लीत डबल इंजिनचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीतील जनता आज एक विकसित दिल्ली बनवण्यासाठी मतदान करणार आहे''.
05 Feb 2025 07:58 AM (IST)
दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. दिल्लीच्या जनतेने भाजपचे सरकार बनवण्याचा निश्चय केल्याचे प्रवेश वर्मा यांनी सांगितले.
05 Feb 2025 07:47 AM (IST)
आपचे नेते आणि जंगपुरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनीष सिसोदिया म्हणाले की, "दिल्लीचे लाखो लोक आज त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी आणि दिल्लीच्या कल्याणासाठी मतदान करतील. मी प्रार्थना केली की, आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन करावे आणि आम्ही दिल्लीला प्रत्येक प्रकारे सुंदर बनवण्यासाठी काम करू"
05 Feb 2025 07:32 AM (IST)
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मतदानापूर्वी कालकाजी मंदिरात जाऊन पूजा केली. सिसोदिया हे सध्या जंगपुरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
05 Feb 2025 07:18 AM (IST)
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूक होत आहे. त्यानुसार, आज मतदान घेतले जात आहे. यामध्ये सुमारे 1.56 कोटी मतदार असून, ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आता या मतदानाला सकाळी सातपासून सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहापर्यंत हे मतदान चालणार आहे.
05 Feb 2025 06:59 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान घेतले जाणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मात्र, एक्झिट पोल संध्याकाळी साडेसहानंतर जाहीर केले जाणार असल्याने संभाव्य चित्र समोर येऊ शकणार आहे.
05 Feb 2025 06:48 AM (IST)
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान घेतले जाणार आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे.
05 Feb 2025 06:42 AM (IST)
दिल्लीत सुमारे 1.56 कोटी मतदार असून, ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 13766 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. त्यापैकी 83.76 लाख पुरुष, 72.36 लाख महिला, तर 1267 तृतीयपंथी मतदार आहेत.
05 Feb 2025 06:30 AM (IST)
मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि मतदारांना गर्दीची स्थिती जाणून घेण्यास मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाने रांग व्यवस्थापन अॅप (QMS) लाँच केले आहे. याशिवाय, ७,५५३ पात्र मतदारांपैकी ६,९८० मतदारांनी 'घरून मतदान करा' सुविधेअंतर्गत आधीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
05 Feb 2025 06:26 AM (IST)
दिल्ली निवडणूक २०२५ मध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून ७३३ मतदान केंद्रे खास तयार करण्यात आली आहेत.
05 Feb 2025 06:22 AM (IST)
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या, दिल्ली पोलिसांचे ३५,६२६ कर्मचारी आणि १९,००० होमगार्ड तैनात केले आहेत.
05 Feb 2025 06:16 AM (IST)
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी (आप) त्यांच्या कल्याणकारी योजनांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, भारतीय जनता पक्ष (भाजप) २५ वर्षांनंतर राजधानीत सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहे. दुसरीकडे, २०१३ पर्यंत १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. यावेळी ती पुन्हा एकदा तिचे गमावलेले स्थान परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
05 Feb 2025 06:10 AM (IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल. या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस त्यांच्या पुनरागमनाची आशा बाळगत आहेत.
05 Feb 2025 06:06 AM (IST)
राजधानीतील ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये १.५६ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी १३,७६६ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे ६९९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ही निवडणूक दिल्लीच्या राजकारणाची दिशा ठरवू शकते.
05 Feb 2025 06:02 AM (IST)
१९९८ ते २०१३ पर्यंत काँग्रेसने दिल्लीवर राज्य केले, तेव्हा शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राजधानीतील विकासकामांवर लक्ष केंद्रित केले. पण २०१३ मध्ये, जेव्हा आम आदमी पक्षाने पहिल्या निवडणुकीत २८ जागा जिंकून शानदार प्रवेश केला, तेव्हा काँग्रेससाठी अडचणी सुरू झाल्या. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि पक्ष शून्यावर आला. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये, एकेकाळी काँग्रेसचे पारंपारिक समर्थक मानले जाणारे मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येने 'आप'ला मतदान केले. यामुळे काँग्रेसची स्थिती आणखी कमकुवत झाली, परंतु आता काँग्रेसची नवीन रणनीती म्हणजे मुस्लिमबहुल जागांवर आपली सर्व ताकद केंद्रित करणे.