File Photo : MNS
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून प्रचारसभा, बाईक रॅली, घरोघरी भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या. त्यात सोमवारी (दि.18) सायंकाळी निवडणुकीचा प्रचार थांबला. मात्र, सध्या चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीला असलेल्या छुप्या पाठिंब्याची. कारण, शिवडी मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथे झालेल्या सभेतच महायुतीचे झेंडे दिसून आले होते. त्यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथील सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सभेत मनसेसह महायुतीतील घटक पक्षांचे झेंडेही फडकताना दिसल्याने पोलखोल झाली आहे. हा सगळा प्रकार ‘फिक्सिंग’चा खेळ असल्याचे सांगत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. महायुतीत अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, शिवसेने (शिंदे गट) चे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेणार नाही, असे ठणकावून सांगितले होते.
दरम्यान, नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सरवणकरांच्या बाजूने उभे राहिले. अखेर भाजपा नेत्यांनीही अमितला पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. परंतु, नांदगावकरांबाबतचे गूढ अजूनही कायम होते. नांदगावकर यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली नाही. तसेच त्यांच्या प्रचारसभांमध्ये महायुतीचा एकही नेता दिसला नाही. मात्र, नांदगावकर यांच्या प्रचार दौऱ्यांत ते महायुतीचे उमेदवार असल्याचेही दावे करण्यात आले.
महायुतीच्या झेंड्यांनी केलं सर्वकाही उघड
सोमवारी राज ठाकरे यांच्या सभेत फडकणाऱ्या महायुतीच्या झेंड्यांनी सर्व काही उघड केले. या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला होता.