कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन! (Photo Credit- X)
आपल्या व्हिडिओमध्ये कमल हासन यांनी बदलत्या जागतिक समीकरणांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “इराण युद्धाची परिस्थिती आणि सागरी व्यापारी मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांचा थेट परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा खनिज तेल आणि गॅस आयात करत असल्याने, याचा थेट फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. घरगुती एलपीजी (LPG), पेट्रोल-डीझेल, खते आणि उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल सातत्याने महाग होत चालला आहे.”
India has overcome wars, shortages, and global crises before – through unity and shared sacrifice. This moment calls for the same national spirit again. 🇮🇳 pic.twitter.com/Mi56m0I4pD — Kamal Haasan (@ikamalhaasan) May 22, 2026
या गंभीर परिस्थितीत जगातील अनेक देशांनी आधीच ‘एनर्जी-एजिंग’ (Energy-Saving Regulations) सारखे कडक नियम लागू केले आहेत. सिंगापूरसारख्या प्रगत देशांचे नेतेही आपल्या नागरिकांना आगामी कठीण काळासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचा सल्ला देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या आवाहनाचा उल्लेख केला, ज्यामध्ये पंतप्रधानांनी देशवासीयांना पुढील एक वर्ष वीज आणि इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले होते.
राजकीय मतभेदांपेक्षा देशाचे हित मोठे असल्याचे सांगताना कमल हासन यांनी माजी पंतप्रधानांचे दाखले दिले. ते म्हणाले, “संकट काळात देशाप्रती असलेली जबाबदारी कोणत्याही राजकीय मतभेदापेक्षा मोठी असली पाहिजे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत म्हटले होते की, ‘सरकारें आएंगी-जाएंगी, पार्टियां बनेंगी-बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए.’ तसेच, १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान देशातील नागरिकांनी आपल्या घरातील सोने देशासाठी दान केले होते. १९६५ च्या अन्नधान्य संकटाच्या वेळी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना आठवड्यातून एक वेळचे जेवण सोडण्याचे आवाहन केले होते आणि जनतेने त्याला प्रतिसाद दिला होता.” ते पुढे म्हणाले, “आजच्या घडीला देशाला तेवढ्या मोठ्या त्यागाची गरज नाही. मात्र, छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या पार पाडूनही नागरिक मोठे योगदान देऊ शकतात. आपल्या जुन्या पिढ्यांनी देशासाठी इतके मोठे त्याग केले, मग आज आपण वीज आणि इंधन वाचवण्यासारखा छोटा प्रयत्न करू शकत नाही का?”
या व्हिडिओमध्ये कमल हासन यांनी केंद्र सरकारच्या काही सकारात्मक धोरणांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत भारताने सौर ऊर्जा (Solar Energy) आणि पवन ऊर्जा (Wind Energy) क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कोळसा गॅसिफिकेशन (Coal Gasification), रिन्युएबल एनर्जी आणि अणुऊर्जेतील वाढती गुंतवणूक हे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल आहे. परदेशी तेल आणि गॅसवरील अवलंबित्व कमी करणे ही भारताच्या आर्थिक स्वावलंबित्वासाठी काळाची गरज बनली आहे.
केवळ सामान्य जनतेकडूनच त्यागाची अपेक्षा केली जाऊ नये, असे स्पष्ट करत कमल हासन यांनी प्रशासनालाही काही सल्ले दिले. ते म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, त्यांनी तातडीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक राष्ट्रीय बैठक बोलवावी. केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे पेट्रोल आणि डिझेलवरील कर (Taxes) कमी केले पाहिजेत. तसेच बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट दर घटवले पाहिजेत, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (Public Transport) वापर करतील. आज वाचवलेला प्रत्येक लीटर इंधनाचा थेंब आणि विजेचे प्रत्येक युनिट भविष्यातील भारताला अधिक मजबूत करेल.”
आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “भारताने यापूर्वीही राष्ट्रीय एकता आणि सामूहिक त्यागाच्या जोरावर अनेक युद्धे, टंचाई आणि जागतिक संकटांवर मात केली आहे. आज पुन्हा एकदा त्याच राष्ट्रीय भावनेची देशाला गरज आहे.” जर आपण एकजुटीने या संकटाचा सामना केला, तर भारत या कठीण काळातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कलन हसन यांनी लगावली डोनाल्ड ट्रम्पला शाब्दिक चपराक; राष्ट्राभिमान नेहमीच सर्वोतोपरी






