फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, आमिर ५ जुलै रोजी त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत खासगी समारंभात विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप आमिर किंवा त्याच्या टीमकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. गेल्या वर्षी आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने प्रथमच गौरी स्प्रॅटची ओळख प्रसारमाध्यमांना करून दिली होती. त्यावेळी गौरी त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कार्यरत असल्याचे त्याने सांगितले होते. विशेष म्हणजे, दोघांनी तब्बल दीड वर्ष आपले नाते गुप्त ठेवले होते.
कोण आहे गौरी स्प्रॅट?
गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची रहिवासी आहे. तिचे बालपण आणि शिक्षणही तेथेच झाले. तिची आई रीटा स्प्रॅट या ब्युटी आणि सलून व्यवसायाशी संबंधित होत्या. गौरीने ब्ल्यू माउंटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००४ मध्ये लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. सध्या ती मुंबईतील बीब्लंट सलूनशी निगडित व्यवसाय सांभाळत असल्याचे समोर आले आहे. तसेच, ती सात वर्षांच्या मुलाची आई असल्याचेही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
आमिरच्या दोन विवाहांची कहाणी
आमिर खानने १९८६ मध्ये त्याची बालमैत्रीण रीना दत्ता हिच्यासोबत विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि इरा अशी दोन मुले आहेत. मात्र, १६ वर्षांच्या संसारानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर २००५ मध्ये आमिरने दिग्दर्शक आणि निर्माती किरण राव हिच्याशी लग्न केले. २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तरीही ते त्यांच्या मुलगा आझादचे संगोपन एकत्रितपणे करत आहेत.
गौरीमुळे आयुष्यात समाधान मिळाल्याचे आमिरचे मत
नुकत्याच एका मुलाखतीत आमिरने गौरीबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, “गौरी माझ्या आयुष्यात आली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. तिच्यासोबत मला शांतता आणि स्थैर्य मिळते. आम्ही दोघे एकत्र खूप आनंदी आहोत.” तसेच, “आज मला वाटते की माझे आयुष्य पूर्णत्वाकडे गेले आहे,” असेही त्याने म्हटले. गेल्या काही महिन्यांत आमिर आणि गौरी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. चीनमध्ये आयोजित मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिव्हलमध्येही दोघांनी एकत्र उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.






