फोटो सौजन्य - Social Media
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत विविध शैलींचे प्रयोग होत असताना हॉरर या प्रकारालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या बदलत्या प्रवाहात सातत्याने दर्जेदार आणि वेगळ्या संकल्पनांचे चित्रपट सादर करत युवा दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘घबाडकुंड’लाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सलग दोन यशस्वी हॉररपटांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीजपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ आणि ‘ढिशक्यांव’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी दिग्दर्शनाची वेगळी शैली प्रेक्षकांसमोर मांडली. मात्र ‘अल्याड पल्याड’ आणि ‘घबाडकुंड’ या दोन हॉररपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली.
‘घबाडकुंड’चे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स मिळाले आहे. भय, रहस्य, अॅक्शन, भावनिक प्रसंग आणि थरार यांचा समतोल साधणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी करत मराठी हॉररपटांबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ. रसिक कदम (आयकॉन द स्टाईल) यांनी प्रीतम एस. के. पाटील यांच्या दिग्दर्शनावर सुरुवातीपासून विश्वास दाखवत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला. त्यांच्या विश्वासामुळेच ‘घबाडकुंड’सारखा भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट साकार होऊ शकला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार व्हिज्युअल्स आणि प्रभावी कथनशैली यामुळे या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे.
याबाबत बोलताना प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’वर जसं भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम ‘घबाडकुंड’लाही मिळत आहे. हा प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायी असून जबाबदारीही वाढवणारा आहे. मराठी प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा हॉरर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील. प्रेक्षकांच्या विश्वासामुळेच आम्ही आणखी मोठ्या कथा आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स विस्तारण्याचं धाडस करू शकतो.” विदर्भातून येऊन मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे प्रीतम एस. के. पाटील हे आज नव्या पिढीतील आश्वासक दिग्दर्शक म्हणून ओळखले जात आहेत. सलग दोन यशस्वी हॉररपटांनंतर त्यांच्याकडून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. मराठी हॉररला नवी दिशा देण्याची क्षमता असलेला हा युवा दिग्दर्शक आगामी काळात आणखी मोठे आणि वेगळे प्रयोग करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.






