हिवाळ्यात सोरायसिसचा वाढता धोका (फोटो- istockphoto)
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वाढला थंडीचा कडाका
थंडीच्या काळात हायड्रेशन पातळी घसरण्याची शक्यता
थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कमी
पिंपरी/विजया गिरमे: हिवाळा सुरू होताच थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे, गरम पेये आणि बंद खोलीतील जीवनशैली वाढते. मात्र, याच काळात शरीरासाठी अत्यावश्यक असलेले पाणी पिण्याकडे अनेकांचे नकळत दुर्लक्ष होते. तहान न लागणे म्हणजे शरीराला पाण्याची गरज नाही, असा गैरसमज पसरलेला आहे. परिणामी शरीरातील हायड्रेशन पातळी घसरते आणि त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसू लागतो. कोरडी, खाजरी आणि फाटलेली त्वचा ही सुरुवात ठरते, तर पुढे सोरायसिससारख्या दीर्घकालीन त्वचारोगांचा (health)धोका वाढतो.
थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कमी होते. त्यातच गरम पाण्याने अंघोळी, साबणांचा अतिरेक आणि मॉइश्चरायझरकडे होणारे दुर्लक्ष परिस्थिती अधिक गंभीर करते. शहरातील त्वचारोग ओपीडींमध्ये हिवाळ्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. सौंदर्याच्या पलीकडे जाऊन त्वचारोग आता आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहेत. हिवाळ्यातील हायड्रेशनचा अभाव आणि सोरायसिस यांच्यातील ही नाळ वेळीच ओळखण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
तहान नाही म्हणजे गरज नाही? ही मोठी चूक!
उन्हाळ्यात शरीर पाण्याची मागणी स्पष्टपणे करते. मात्र हिवाळ्यात तहान न लागणे म्हणजे शरीराला पाण्याची गरज नाही, असा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये आहे. प्रत्यक्षात थंड हवामानातही शरीरातील पाणी कमी होत असते. श्वसनातून, लघवीतून आणि त्वचेतून होणारे पाण्याचे नुकसान लक्षात येत नाही — आणि याच ठिकाणी त्वचेची समस्या सुरू होते.
सोरायसिस म्हणजे नेमकं काय?
सोरायसिस हा संसर्गजन्य नसलेला, पण दीर्घकालीन आणि पुन्हा पुन्हा उद्भवणारा त्वचारोग आहे. यामध्ये त्वचेवर जाड, पांढरट चकत्या, खाज, जळजळ आणि कधी कधी रक्तस्राव होतो. हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी होत असल्याने सोरायसिसचे झटके तीव्र होतात.
हिवाळ्यात सोरायसिस का बळावतो?
हवेत आर्द्रता कमी होते
सूर्यप्रकाश कमी मिळतो
गरम पाण्याने अंघोळ वाढते
पाणी पिण्याचे प्रमाण घटते
त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होते
फक्त आजार नाही, मानसिक ताणही वाढतो
सोरायसिस केवळ शारीरिक त्रास देत नाही, तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो.
हात, मान, डोके किंवा चेहऱ्यावर दिसणाऱ्या चकत्यांमुळे अनेक रुग्ण सामाजिक वावर टाळतात. आत्मविश्वास कमी होतो, नैराश्य आणि चिडचिड वाढते. त्यामुळे हा आजार केवळ ‘त्वचेपुरता’ न मानता सर्वांगीण आरोग्याचा प्रश्न बनतो.
Health Care : शांत झोप काळोखातच का लागते ? काय आहे यामागील शास्त्रीय कारण
हायड्रेशन: सोरायसिसविरुद्ध पहिली ढाल
सोरायसिसवर औषधांइतकेच पाणी महत्त्वाचे आहे.
दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी
कोमट पाणी प्राधान्याने
नारळपाणी, सूप, ताक यांचा समावेश
कॉफी, मद्याचे प्रमाण मर्यादित
यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि औषधांचा परिणामही चांगला दिसतो.
जर त्वचा खूप फुटत असेल, रक्त येत असेल, पांढऱ्या जाड खव्यासारखी होऊ लागली किंवा सतत जास्त खाज‑दाह होत असेल तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. अशावेळी एक्झिमा, सोरायसिससारखा आजार आहे का हे तपासून त्यानुसार औषधांची गरज ठरवावी.
श्रीकांत खानापुरकर, त्वचारोग तज्ज्ञ.
मुलालाही हिवाळ्यात त्वचेची कोरडेपणा आणि खाज वाढल्याची समस्या आहे. साध्या हिवाळा वाढला असून यामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारने आणि शाळांनी हायड्रेशन आणि त्वचेच्या काळजीबद्दल जनजागृती मोहीम राबवावी, जेणेकरून तरुणांमध्ये याची जाणीव वाढेल..
प्रिया शहा, नागरिक.






