दिव्यांची आरास, नक्षीदार रांगोळी आणि चविष्ट फराळ अशी दिवाळीची आठवण. आनंद आणि उत्साहाच्या या वातावरणात सध्या एका गोष्टीचा अतिरेक जास्त पाहायला मिळतो. ते म्हणजे फटाके. खरंतर फटाके हे तसे खूप आधीपासून दिवाळीत फोडले जातात. मात्र आाताच्या काळात त्याचा वापर आणि त्यातील केमिकलचा दुष्परिणाम हा जास्त वाढत आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या रंगीत अशा सणाचा फटाक्यांनी बेरंग केला आहे. या सणासोबत वाढलेलं वातावरणीय प्रदूषण चिंताजनक ठरत आहे. फटाक्यांचा धूर, वाढत्या वाहनांचे प्रदुषण आणि धूळ यामुळे हवेतील प्रदूषणाचं प्रमाण झपाट्याने वाढतं. हे प्रदूषण सर्वांसाठी धोकादायक असलं तरी, याचा सर्वात जास्त होणारा त्रास हा गर्भवती महिलांना असतो.
फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म धूलिकण (PM 2.5, PM 10) असतात. हे घटक श्वसनसंस्थेवर घातक परिणाम करतात. एवढंच नाही तर रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी देखील यामुळे कमी होतं. गर्भवती महिलांमध्ये यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, श्वास घेताना त्रास अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही अभ्यासांनुसार, जास्त प्रदूषणामुळे गर्भातील बाळाच्या वाढीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या काळात महिलांनी काही सोपे पण प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे.
फटाक्यांच्या धुरापासून शक्य तितके दूर राहा.
घरात धूप आणि कापूर जाळा यामुळे घरातील वातावरण जंतूनाशक होईल.
बाहेर पडताना N95 मास्क वापरा.
घरात एअर प्युरिफायर किंवा झाडं (जसे की मनी प्लांट, स्पायडर प्लांट) ठेवा.
भरपूर पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी प्या यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करा.
सकाळी किंवा संध्याकाळी धुराच्या वेळेत बाहेर जाणं टाळा.
काही जणांना फटाक्यांच्या धुरामुळे शिंका येतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या.
रोज रात्री झोपताना कोमट हळदीचं दूध प्या जेणेकरुन तुम्हा घसादुखी किंवा सर्दीचा फार त्रास होणार नाही.
दिवाळीचा आनंद साजरा करताना सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने साजरी करणे हीच खरी आनंदाची आणि समाधानाची दिवाळी आहे.तेलाचे दिवे, फुलं, सुगंधी मेणबत्त्या आणि निसर्गपूरक सजावट यांचा वापर करा. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास आई-बाळ दोघांचेही आरोग्य जपले जाईल आणि सणाचा खरा आनंद अनुभवता येईल.