भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५००० च्या पुढे, २४ तासांत ४ मृत्यू (फोटो सौजन्य-X)
Corona Case Update News in Marathi : भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी, संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५,००० च्या पुढे गेली आहे. राज्य सरकारांनी कोरोनाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने सुविधा-स्तरीय तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिल देखील आयोजित केले आहेत. तसेच शुक्रवारी (6 जून) दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ झाली असून 114 रुग्ण सापडले तर एका 47 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला .
भारतात सध्या कोरोनाचे ५,३६४ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारपर्यंत, गेल्या २४ तासांत चार नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळ हे कोरोनाबाबत सर्वाधिक प्रभावित राज्य राहिले आहे. त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.
गेल्या २४ तासांत केरळमध्ये १९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८ आणि दिल्लीमध्ये ३० कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोना संसर्गाचे ४९८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीत कोरोना संसर्गाचे ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५९२ वर पोहोचली आहे. १ जानेवारीपासून दिल्लीत कोरोनामुळे सात मृत्यूंची नोंद झाली आहे. गुरुवारपासून एकही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. कोविड-१९ रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्राने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे ११४ नवीन रुग्ण आढळले आहेत. या वर्षी जानेवारीपासून एकूण रुग्णांची संख्या १,२७६ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे.
कोरोना संसर्ग झाल्यास फुफ्फुसांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे सौम्य ते गंभीर श्वसन समस्या उद्भवतात. तसेच काही प्रकरणांमध्ये कोरोना हा आजार बरा झाल्यानंतरही फुफ्फुसे योग्यरित्या कार्य करु शकत नाहीत. अनेकदा कोविडमुळे फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम होतो.