
भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात ‘लाडली बहना’ व उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांना स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर, तसेच गरीब कुटुंबांतील मुलींना पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
भोपाळ : भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात ‘लाडली बहना’ व उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांना स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर, तसेच गरीब कुटुंबांतील मुलींना पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्यात १७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. गहू व धानासाठी वाढीव किमान हमीभाव, ‘लाडली बहना’ योजनेच्या लाभार्थ्यांना घरे आणि गरीब विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षण ही जाहीरनाम्यातील इतर वैशिष्ट्ये आहेत.
९६ पानांचे हे ‘संकल्प पत्र’ भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी जारी केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व इतर नेते या वेळी हजर होते. ही आश्वासने म्हणजे ‘मोदींची हमी व भाजपचा विश्वास’ असल्याचे पक्षाने सांगितले. गव्हासाठी २७०० रुपये क्विंटल आणि धानासाठी ३१०० रुपये क्विंटल किमान हमीभाव देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात आहे. काँग्रेसने गव्हासाठी २६०० रुपये हमीभावाचे आश्वासन दिले आहे, हे उल्लेखनीय.
‘लाडली बहना’ योजनेच्या लाभार्थ्यांना घरे, तसेच प्रत्येक कुटुंबातील किमान एकाला नोकरी किंवा रोजगाराची संधी अशीही आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. या संकल्प पत्रानुसार, भाजप राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यास पक्ष भारतीय तंत्रज्ञान संस्थाच्या (आयआयटी) धर्तीवर मध्य प्रदेशात तंत्रज्ञान संस्था आणि ‘एम्स’च्या धर्तीवर वैद्यकीय संस्था उभारेल. सहा नवे द्रुतगती महामार्ग आणि आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे.