CJP Protest: जंतरमंतरवरील तरुणांना अन्न पाणी पुरवणाऱ्या मोहम्मद जुनैदच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून मानसिक छळ
मोहम्मद जुनैद यांचे वडील मुस्तफा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांव गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेश पोलीस चौकशीच्या नावाखाली त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सतत त्रास देत आहेत. पोलिसांच्या सततच्या त्रासामुळे जुनैदच्या आईची प्रकृती खूपच खालावली आहे. गेल्या काही दिवसांत युपी पोलिस सातत्याने त्यांच्या घरी येऊन चौकशी करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांकडून कागदपत्रांची मागणी करत असल्याचा आरोप मुस्तफा जुनैद यांनी केला आहे.
“माझा मुलगा काहीही चुकीचे करत नाही. तो लोकांची सेवा करत आहे. तो लहानपणापासूनच लोकांना मदत करत आला आहे. पण २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मसुरी पोलीस आमच्या घरी आले होते. पोलिसांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली आणि आम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे आम्हालाआधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्रांविषयी माहिती विचारण्यात आली,असाही आरोप मुस्तफा जुनैद यांनी केला आहे.
चौकशीनंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना परत पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २४ जुलै रोजी, मुस्तफा यांना पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. २४ जुलैलादेखील दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. असा दावा केला जातो की, २४ जुलैच्या सकाळी पोलिसांनी मेरठमधील जुनैदच्या मोठ्या बहिणीच्या सासरच्या घरी भेट दिली आणि त्याच्या सासऱ्यांचीही चौकशी केली. त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीचा व्यवसाय करते. जुनैदने नुकतेच एलएलबी पूर्ण केले आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान जुनैद अनेक आठवडे जुनैद केवळ व्यवस्थेचे काम पाहत होते. पण आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात त्याचे नाव अचानक राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि तिथून पुढे त्यांच्या कुटुंबियांना मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. जुनैदने युपी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनातील सहभागामुळे उत्तर प्रदेश पोलिस माझ्या घरी गेले. गाझियाबादमधील घराची झडती घेण्यात आली आणि वडील मुस्तफा यांना चौकशीसाठी नेण्यात आले. बँक पासबुक आणि पॅन कार्डसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. असाही आरोप जुनैद यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
पोलिस इथेच थांबले नाही, त्यांनी मेरठमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांचाही छळ केल्याचा आरोप जुनैद यांच्या कुटुबिंयांकडून करण्यात आला. पण मेरठ पोलिसांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात जुनैदच्या नातेवाईकांना ताब्यात घेतल्याची किंवा त्यांच्यावर कारवाई केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान अनेक नेते आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंचावरून भाषणे देत राहिले, पण जुनैद क्वचितच माईकवर दिसले. त्यांची भूमिका केवळ आंदोलनस्थळाचे व्यवस्थापन करण्यापुरती मर्यादित होती.
पण जसजसे आंदोलन पुढे सरकत गेले, तसतसे ‘जुनैद भाई’ हे नाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. सलग ४९ दिवस संपावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या गरजांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून अनेक आंदोलकांनी त्यांना स्मरणात ठेवले.






