मध्य भारतात पावसाची ६५ टक्के तूट
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच केरळमध्ये वेळेआधी दाखल होऊनही नैऋत्य मान्सूनची देशभरातील वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी, देशातील अनेक भागांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेती, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १६ जून २०२६ या कालावधीत मध्य भारतात सर्वाधिक ६५ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. या भागात सरासरी ५५.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्र राज्यातील काही भागांचा समावेश होतो. या राज्यांतील खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असल्याने पावसातील ही तूट चिंताजनक मानली जात आहे.
पूर्व आणि ईशान्य भारतातही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. या प्रदेशात १२५.८ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ७७.५ मिमी पाऊस झाला असून, सुमारे ३८ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. सामान्यतः हंगामाच्या सुरुवातीला मुबलक पाऊस पडणाऱ्या अनेक भागांत यंदा दीर्घ कोरडा कालावधी दिसून येत असल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आर्द्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशपातळीवर तूट ३६ टक्के
देशपातळीवर पाहता या कालावधीत भारतात ५९.७ मिमी सरासरीच्या तुलनेत फक्त ३८.१ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण पावसाची तूट ३६ टक्क्यांवर पोहोचली आहे. याउलट वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात तुलनेने समाधानकारक स्थिती आहे. वायव्य भारतात २४.४ मिमी सरासरीच्या तुलनेत २४.६ मिमी पाऊस पडला असून पाऊस जवळपास सामान्य राहिला आहे. दक्षिण भारतातही ६९.१ मिमीच्या सरासरीच्या तुलनेत ५९.४ मिमी पाऊस झाल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते.
अल निनोचा प्रभाव मजबूत होणार
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्री क्षेत्रांमध्ये प्रभावी कमी दाबाची प्रणाली किंवा अन्य हवामान यंत्रणा सक्रिय नसल्याने मान्सूनची प्रगती मंदावली आहे. उपग्रह चित्रांमधूनही मान्सूनशी संबंधित ढगांच्या संघटित पट्ट्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील अल निनोचा प्रभाव मजबूत होण्याची शक्यता असून, इतिहासात एल निनोचा संबंध भारतातील कमकुवत मान्सूनशी जोडला गेला आहे.






