दिल्लीतील बैठक : नाशिक बाजार समिती संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजावाजा झाला. मागील बऱ्याच दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वारंवार कांदा खरेदी सुरु करावी यासाठी वारंवार मध्यस्थी करण्यात येत आहे. परंतु व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नाशिकमधील व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केली आहे. नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करत कांदा खरेदी सुरु करण्याची मागणी केली. अब्दुल सत्तार म्हणाले की, २ लाख टन कंदा खरेदीची परवानगी गोयल यांनी दिली आहे. व्यापाऱ्यांची मागणी होती की, भाव निश्चित ठरवावा. ५४५ मार्केट कमिट्यांमधून माहिती घेऊन २ हजार २९० रुपये आजचा भाव आलेला आहे. सरकारच्या मागणीप्रमाणे ज्या-ज्या भागात कांदा शिल्लक असेल तिथं खरेदीला परवानगी दिली जाईल. ४०० कोटी रुपयांची कांदा खरेदी सरकार करणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होईल. ४० टक्क्यांबाबत आम्ही विनंती केली आहे. मला वाटतंय शेतकरी बांधवांचं हित लक्षात घेऊन आम्ही व्यापाऱ्यांना बोलावून निर्णय घेऊ. तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की खरेदी सुरू करा, असं आवाहन त्यांनी केलं.