मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना साथ देणाऱ्या शिवसेनेच्या ४० आमदारांप्रमाणेत खासदारही बंडाच्या (Shivsena MP’s Rebel) पवित्र्यात आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली.
आगामी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये (Presidential Election) कुणाला पाठिंबा द्यायचा याविषयी शिवसेनेच्या (Shivsena) बैठकीमध्ये चर्चा झाली. तसेच, लोकसभेच्या १८ पैकी १२ खासदारांनी उपस्थिती लावली, तर ६ खासदार अनुपस्थित राहिले. राज्यसभेचे अनिल देसाई वगळता तिन्ही खासदार बैठकीला हजर होते. आपण भाजपच्या विरोधात असल्याने ‘संपुआ’चे (UPA) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली. राऊत यांच्या भूमिकेस बहुतांश खासदारांनी विरोध केला. जरी आपला भाजपला विरोध असला तरी द्रौपदी मुर्मू अनुसूचित जमातीच्या उमेदवार असल्याने सेनेने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका बहुतांश खासदारांनी मांडल्याचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी बैठकीनंतर सांगितले.
एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्या, अशी विनंती सेनेच्या खासदारांनी उद्धव यांना केल्याचे समजते. तसेच, मी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करतो, असे उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान असून गुरुवारी मुर्मू या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या खासदारांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असून पाठिंबा दिल्यास मुर्मू आभार मानण्यासाठी ‘मातोश्री’वर येऊ शकतात.