नववीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या शौचालयात दिला बाळाला जन्म, काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य-X)
कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका सरकारी निवासी शाळेच्या शौचालयात एका नववीच्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिला. मुलगी आणि नवजात दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यांच्यावर शाहपूर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.
कर्नाटक राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य कोसुंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादगीर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत नववीच्या विद्यार्थिनीने गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० च्या सुमारास शाळेच्या शौचालयात एका बाळाला जन्म दिला.कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य शशिधर कोसंबे यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा अहवाल दाखल करण्याचे आणि तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांनी आयोगाला माहिती देण्यात अपयशी ठरल्याने शाळेच्या मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वतःहून खटला दाखल केला जाईल.
या प्रकरणावर कोसांबे म्हणाले, “राज्यात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी डीसीपी यादगिरी यांना घटनास्थळी भेट देऊन गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. तसेच, डीसीपींना आज संध्याकाळपर्यंत आयोगाला एक व्यापक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दरमहा मुलीची तपासणी करायला हवी होती. तथापि, असे दिसते की त्यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या आहेत. आणि यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंतीही आम्ही केली आहे.”
दरम्यान, पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणात मुख्याध्यापक, वॉर्डन, स्टाफ नर्स आणि पीडितेच्या भावाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासानंतर संबंधिक कलमांमध्येही भर घातली जाईल. पीडितेचे वय तिच्या शैक्षणिक कागदपत्रांनुसार १७ वर्षे आहे. रुग्णालयाच्या भेटीत डीसी आणि एसपींसह मुख्य कार्यकारी अधिकारी लविश ओर्डिया उपस्थित होते.