...व्हायचे तेच झाले..! शेअर बाजार घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 1.82 लाख कोटींचे नुकसान!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज(ता.23) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान शेअर बाजारात मात्र बराच चढ-उतार पाहायला मिळाला. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प वाचत असताना सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली, पण बाजार बंद होईपर्यंत त्यात बऱ्यापैकी रिकव्हरी होताना दिसली. सुरुवातीला सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी घसरला, पण नंतर बाजाराने पुन्हा वेग घेतला.
गुंतवणूकदारांचे 1.82 लाख कोटींचे नुकसान
आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 73 अंकांनी घसरुन 80,429 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 30 अंकांच्या घसरणीसह 24,479 अंकांवर बंद झाला. ज्यामुळे आज बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 1.82 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये घसरण
अर्थसंकल्पाच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) मार्केट कॅप 446.50 लाख कोटी रुपयांवर आला. जो सोमवारच्या सत्रात 448.32 लाख कोटी रुपयांवर होता. ज्यामुळे मार्केट कॅपमध्ये तब्बल 1.82 लाख कोटींची घसरण पाहायला मिळाली आहे.
हे 10 शेअर्स सर्वाधिक घसरले
शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) 30 पैकी 13 शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले, तर 17 शेअर्स लाल चिन्हावर बंद झाले. L&T शेअर (3.10%) सर्वाधिक घसरले. याशिवाय लार्ज कॅप कंपन्यांमधील बजाज फायनान्स शेअर (2.18%) आणि SBI शेअर (1.65%) घसरुन बंद झाले. मिडकॅप कंपन्यांमध्ये NIACL (5.79%), IRFC (5.08%), GICRE शेअर (4.15%) घसरणीसह बंद झाले. तर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये IRCON शेअर 7.99%, SCI 7.53%, RCF 7.49% आणि NFL शेअर 7.09% ने घसरले.